शहरात प्रशासनाकडून सायंकाळनंतर सार्वजनिक गणेश मडंळाच्या श्रींचे विसर्जन सुरू करण्यात आले. प्रचंड पोलिस बंदोबस्तात पंढरपूर रस्त्यावरील श्रीमंत गणेशोत्सव मंडळ आणि मंगळवार पेठेचा राजा, शिवाई गणेशोत्सव मंडळ या तीन मुख्य गणपतींचे विसर्जन प्रशासनाने महापालिकेच्या यंत्रणेद्वारे केले. संचारबंदीमुळे परिस्थिती नियंत्रणाखाली येत असल्याचे दिसताच जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त, महापालिकेचे पंचवीस कामगार, वाहने, मोठ्या मूर्ती उचलण्यासाठी क्रेन, कृष्णाघाटावर मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विशेष यंत्रणा हा सगळा लवाजमा प्रशासनाने तयारच ठेवला होता.
अनंत चतुदर्शीच्या विसर्जन मिरवणुकीतील शिवसेनेच्या स्वागत कमानीच्या वादामुळे गेल्या चार दिवसांपासून हे विसर्जन खोळबंले होते. दोन गटात दंगल, भाजपच्या दोघा आमदारांना झालेली अटक पोलिस प्रशासन आणि गणेश उत्सव मंडळाच्या निर्माण झालेला तणाव, या सगळ्या घडामोडीनंतर सध्या शहरात कडक संचारबंदी लागू आहे. त्याचाच अचूक फायदा घेऊन प्रशासनाने प्रचंड पोलिस बंदोबस्तात विसर्जित न झालेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आज सायंकाळी किमान तीनशे सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा सोबत घेऊन मुख्य रस्त्यांवर अद्यापही ज्या सार्वजनिक मंडळांचे गणपती मंडपातच आहेत, अशा मोठ्या मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठीची यादीच तयार केली होती आणि याच यादीतील क्रमाप्रमाणे हे विसर्जन सायंकाळनंतर सुरू झाले. संचारबंदी असल्याने यावेळी संबंधित मंडळाचे कार्यकर्ते मंडळाकडे फिरकले देखील नाहीत. रात्री उशिरापर्यंत मोठ्या मंडळाच्या किमान पन्नासभर गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते.