हेमंत आठल्ये

भारत,पाक,उत्तर कोरियासारखेच -ओबामा

In बातमी, सकाळ on जुलै 17, 2009 at 12:46 pm

सकाळ – अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी परराष्ट्र धोरणासंबंधी केलेल्या भाषणात अखेर भारताचा उल्लेख आला; मात्र तो वेगळ्या अर्थाने. जगात अण्वस्त्रांचा प्रसार होण्यास ओबामांनी पाकिस्तान आणि उत्तर कोरियाबरोबर भारतालाही दोषी धरले. त्यांच्या लेखी हे तीनही देश सारखेच ठरले. ओबामा सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. मॉस्कोतील “न्यू इकॉनॉमिक स्कूल’ या रशियातील “थिंकटॅंक’ समजल्या जाणाऱ्या संस्थेत त्यांनी मंगळवारी परराष्ट्र धोरणाबाबत व्याख्यान दिले.

“शीतयुद्धानंतर थोड्याच कालावधीत भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरियाने अण्वस्त्रांची चाचणी घेतली. त्यामुळे अण्वस्त्रप्रसारबंदी सध्या आहे त्या स्वरूपात किती उपयुक्त ठरेल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. 
या करारात मूलभूत बदल केल्याशिवाय जगात होणाऱ्या अण्वस्त्रप्रसाराला आळा घालणे शक्‍य होणार नाही,” असे ते म्हणाले. रशियाचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्याशी ओबामांनी मंगळवारी अण्वस्त्रकपातीबाबतचा करार केला. या करारानुसार दोन्ही देश येत्या सात वर्षांत त्यांच्या संभारातील दोनतृतीयांश अण्वस्त्रे नष्ट करणार आहेत. हा करार केल्याच्या पार्श्‍वभूमीवर अण्वस्त्रप्रसारबंदीबाबत ओबामांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे; मात्र त्यांनी या वेळी इस्राईलचा उल्लेख टाळला हे विशेष.


इराण आणि उत्तर कोरियाचे अण्वस्त्रे बाळगण्याचे मनसुबे उधळून लावण्यासाठी त्यांनी रशियाचे सहकार्यही या वेळी मागितले. “”सर्वंकष विनाश घडविणारी अस्त्रे नष्ट करणे, हे २१ व्या शतकातील सर्वांत मोठे आव्हान आहे. कोणत्या देशाकडे अण्वस्त्रे असावीत आणि कोणाकडे नसावीत हे ठरवून आपण जगाला आणि स्वतःला वाचवू शकणार नाही. परस्पर संहाराच्या भीतीने अमेरिका आणि रशियाने आपली अण्वस्त्रे एकमेकांविरुद्ध वापरली नाहीत; मात्र असा संयम आणि विवेक किती देश दाखवू शकतील. आम्हा दोघांकडे सर्वांत जास्त अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्याची जबाबदारीही रशिया आणि अमेरिकेची आहे. पूर्व आशिया आणि पश्‍चिम आशियात अण्वस्त्रांची स्पर्धा सुरू होणे हे उभय देशांच्या उपयोगाचे नाही, त्यामुळे उत्तर कोरिया व इराणला अण्वस्त्रसज्ज होण्यापासून रोखण्याची जबाबदारी अमेरिका आणि रशिया दोघांचीही आहे. कोणा एका देशाला लक्ष्य करण्यासाठी मी हे बोलत नाही, तर जगातील सर्व देशांच्या भल्यासाठी बोलत आहे. आपण एकत्र येऊ शकलो नाहीत, तर अण्वस्त्रप्रसारबंदी आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीला काही अर्थ उरणार नाही,” असे ते म्हणाले.


दहशतवादाविरुद्ध एकत्र या – या भाषणात दहशतवादविरोधी लढ्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी रशियाला केले. “”अमेरिका अथवा रशिया या दोघांनाही अफगाणिस्तान अथवा पाकवर ताबा मिळवायचा नाही. शांतीचा संदेश देणाऱ्या इस्लामशी गेली अनेक वर्षे तालिबान आणि अल्‌-कायदा खेळत आहेत. निरपराध महिला, पुरुष आणि मुलांची कत्तल करत आहेत. त्याहीपेक्षा ते मुस्लिमांचीच कत्तल करत आहेत. त्यामुळे त्यांना नष्ट करण्यासाठी एकत्र आले पाहिजे,” असे ओबामा म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: