हेमंत आठल्ये

मनसेत ‘मूषक राज’, शिवसेनेत ‘घुशी’

In बातमी, म. टा. खास on जुलै 30, 2009 at 3:33 pm

म. टा. खास– मराठीच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात सुरु झालेल्या वादाचे पर्यवसान आता शब्दशः रॅट रेस मध्ये झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मूषकराज अशी संभावना शिवसेनेने केली असून, शिवसेनेमध्ये बिनशेपटाच्या घुशी वाढल्या असल्याचा प्रतिटोला मनसेने हाणला आहे.

मध्यंतरी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हाडावर विशाल मोर्चा काढला होता. शिवसेनेची सत्ता आल्यास म्हाडाला पोखरणा-या बिल्डररुपी उंदरांच्या शेपट्या पिरघळून त्यांना बाहेर काढण्यात येईल, असा दम उद्धव यांनी त्यावेळी भरला होता. परंतु गेल्या २७ जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मुखपत्र सामना मध्ये ज्या पान-पानभर जाहिराती प्रकाशित झाल्या, त्यापैकी बहुसंख्य बिल्डरांच्याच होत्या. तोच संदर्भ घेऊन, परवा सामना मध्ये वरपासून खालपर्यंत सगळ्या शेपट्यांच्याच जाहिराती दिसत होत्या, असा चिमटा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांच्या बैठकीत बोलताना काढला होता.

उद्धव आणि राज यांच्यातील या शाब्दिक युद्धात आता त्यांच्या प्याद्यांनीही उड्या घेतल्या आहेत. मनसेमधून शिवसेनेच्या तंबूत दाखल झालेल्या श्वेता परुळकर यांनी राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले. मराठी माणसांना आधार देणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना भवनासमोरच मूषकराज ठाकरे यांनी बिल्डरी साम्राज्य दाखवणारे टॉवर उभे केले आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेना व मराठी माणसांना शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, असा टोला राज ठाकरे यांच्या पूर्वाश्रमीच्या सहकारी असलेल्या परुळकर यांनी लगावला. ब-याच दिवसांनी हे मूषक राज प्रकट झाले व शिवसेनेच्या विरोधात बरळले. हे महाशय स्वतःच एक बडे बिल्डर म्हणजेच मूषक असल्याने त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? शिवसेनेची भक्कम एकजूट पाहून मूषक राज ठाकरे यांचे डोळे पांढरे झाले व त्याच निराशेतून ते आपली शेपटी आपटत आहेत, असा भडिमार परुळकर यांनी केला.

श्वेता परुळकर यांच्या या तोफखान्यावर शांत बसतील तर ते मनसे पदाधिकारी कसले ? मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी श्वेता परुळकर यांचा उल्लेख बिनशेपटाची घूस असा करुन त्यांचा हल्ला परतवून लावला. मर्द म्हणवणा-या शिवसेनेला राज ठाकरेंवर टीका करण्यासाठी बिनशेपटांच्या घुशींची गरज का लागते, असा सवाल त्यांनी केला. राज ठाकरेंना मूषकराज म्हणणा-या श्वेता परुळकर या बिनशेपटाच्या घूस असून नव्याने गळ्यात पट्टा बांधल्यामुळे भुंकणे हे त्यांना क्रमप्राप्त असल्याचा प्रतिटोला पारकर यांनी लगावला. मोर्चात बिल्डरांच्या शेपट्या खेचण्याचे आवाहन करायचे आणि सामना मध्ये वाढदिवसाला त्याच बिल्डररुपी उंदरांच्या जाहिराती घ्यायच्या असली दुटप्पी भूमिका राज ठाकरेंनी कधी घेतली नाही , असेही पारकर म्हणाले.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: