हेमंत आठल्ये

‘स्वाईन फ्लू’चे उगमस्थान

In बातमी, सकाळ, स्वाइन फ्लू on जुलै 31, 2009 at 10:11 सकाळी

सकाळ– ‘स्वाईन फ्लू’चा (एच १ एन १) प्रादुर्भाव वाढत असून, त्याच्या जगभरातील रुग्णांची संख्या सव्वा लाखाच्या घरात गेल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. भारतामध्येही त्याचा संसर्ग झाला आहे. पुण्यात काही शाळांमध्ये त्याचे रुग्ण सापडले आहेत. आपल्याकडील “स्वाईन फ्लू’चा विषाणू तुलनेने सौम्य असल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. घाबरून न जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. सध्याच्या ‘स्वाईन फ्लू’च्या संसर्गाचा उगम अमेरिकेतून आलेल्या व्यक्तीपासून दिसतो आहे. तेथे या रोगाचा संसर्ग अधिक आहे.

अद्ययावत माहिती देण्यासाठी अमेरिकेच्या “सेंटर फॉर डिसिज कंट्रोल’तर्फे (सीडीसी) स्वाईन फ्लूच्या संदर्भात दर शुक्रवारी साप्ताहिक अहवाल दिला जातो. त्यात तेथील प्रत्येक राज्यातील संसर्ग झालेल्यांची आणि दगावलेल्यांची माहिती दिली जाते. त्यानुसार अमेरिकेत “स्वाईन फ्लू’चे ४४००० रुग्ण असून, ३०१ मृत्युमुखी पडले आहेत; पण हे आकडे वास्तव दर्शवीत नाहीत. ते केवळ हॉस्पिटलमधील रुग्णांची स्थिती दर्शवतात. प्रत्यक्ष संख्या याहून मोठी असल्याचे सांगितले जाते. संसर्ग झालेल्यांची संख्या तेथे दहा लाख असेल, असे बोलले जात आहे. वास्तविक नेहमीच्या “फ्लू’च्या मोसमात अमेरिकेत १.५ ते ६ कोटीपर्यंत नागरिकांना त्याचा संसर्ग होतच असतो; पण आता त्याचा मोसम संपत आला असूनही नव्या “फ्लू’चे रुग्ण वाढतच आहेत. स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे प्रमाण एकूण फ्लू रुग्णांच्या ९८% इतके आहे. नव्या स्वाईन फ्लूच्या बळींमध्ये मुलांचा आणि तरुणांचाच प्रामुख्याने समावेश आहे.
“स्वाईन फ्लू’पासून कसा बचाव करावा, तसेच नागरिकांनी इतर काय काळजी घ्यावी, याबद्दल अमेरिकी शासनाकडून प्रचार केला जातो आहे; पण “स्वाईन फ्लू’चा उल्लेख करताना नव्या विषाणूचा फ्लू असा खास उल्लेख करून त्याचा दूरान्वयाने “स्वाईन फ्लू’शी संबंध येणार नाही, याची खबरदारी घेतलेली दिसते. कारण तसा संबंध दाखवल्यास तेथील वराहसंवर्धनाच्या व्यवसायावर गदा येण्याची भीती आहे.
विषाणूकडे प्रथम दुर्लक्ष
पुऱ्या अमेरिकेत स्वाईन फ्लूचा हाहाकार चालू आहे; पण शासनाच्या मते हा विषाणू अमेरिकेतील कुठल्याही डुकरात नाही! याउलट “स्वाईन फ्लू’च्या नव्या विषाणूनिर्मितीत आशियातल्या संसर्गयुक्त व्यक्तीचा संबंध असावा, असा बुद्धिभ्रंश केला जात आहे; तसेच आशियातील पक्ष्यांचे अमेरिकेत होणाऱ्या मोसमी स्थलांतराचा आधार घेतला जातो आहे. या सर्व प्रकारावर “न्यू सायंटिस्ट’ या शास्त्रीय पत्रिकेत डेबोरा मॅकेंझी यांनी प्रकाश टाकला आहे. अमेरिकेतील “स्वाईन फ्लू’ची साथ ही अपेक्षित घटना आहे, असे त्यांनी विशद केले आहे. गेले कित्येक वर्षे “स्वाईन फ्लू’चा विषाणू अमेरिकेत फिरतो आहे; पण त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. त्या मानाने इतर फ्लूच्या प्रकाराबद्दल उदाहरणार्थ, “बर्ड फ्लू’बद्दल जास्त काळजी घेतली गेली. सध्या फ्लूची साथ पसरवणारा विषाणू दहा वर्षांपूर्वीच अमेरिकेत आपली चुणूक दाखवून गेला होता; पण तो विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित (एंडेमिक) होता. त्यानंतरच्या काळात तोच विषाणू वराह, पक्षी आणि मानवाच्या फ्लूच्या विषाणूतील जनुके घेऊन उत्क्रांत पावत होता, असे त्यांनी नमूद केले आहे.
अमेरिकेच्या वराहसंवर्धन केंद्रांत १९९८ पूर्वीही “स्वाईन फ्लू’चे विषाणू नियमितपणे दिसून येत होते; पण ते तुलनेने निरुपद्रवी होते. अर्थात १९१८ मध्ये त्याच विषाणूने अनेकांचे बळी घेतले होते. १९९८ मधील “स्वाईन फ्लू’ विषाणूत महत्त्वाचे बदल घडले. रिचर्ड वेबी याच्या संशोधनानुसार त्या वर्षीच्या “स्वाईन फ्लू’ विषाणूत मानवात आणि पक्ष्यांत होणाऱ्या फ्लूची जनुके सामील झाली. त्यातल्या त्यात पक्ष्यांतील फ्लूचे “आरएनए पॉलिमरेज’ विकराचे जनुक आल्याने “स्वाईन फ्लू’ विषाणूची निर्मिती जलद व्हायला लागली आणि त्याचबरोबर त्याची संसर्गक्षमताही.
नंतरच्या वर्षांत तीनही फ्लूंची जनुके घेतलेले विषाणू अमेरिकी संवर्धन केंद्रांत पसरू लागले आणि त्यातून त्यांचे प्रकारही वाढू लागले. सध्याच्या साथीतील मेक्‍सिकन “एच १ एन १’ विषाणू अशाच प्रकारे प्रगत झाला आहे. सुधारित विषाणूचा फैलाव उत्तर अमेरिकेत विशेषतः ईशान्येला असाच चालू राहण्याची शक्‍यता असल्याने, नुसते उपचारात्मक उपाय पुरेसे ठरणार नाहीत. तेवढ्यावरच भर दिला, तर विषाणूचा प्रसार आणि त्यामुळे होणारा आर्थिक तोटा रोखणे कठीण होणार आहे. “स्वाईन फ्लू’च्या साथीबद्दल याआधी इशारे दिले गेले होते. वर उल्लेख केलेल्या संशोधक वेबीने सन २००४ मध्येच वराहसंवर्धन केंद्रांमध्ये असणाऱ्या फ्लूच्या विषाणूत देशभर साथ पसरवण्याची क्षमता असल्याचे लिहिले होते; तसेच विषाणूचा संसर्ग झाल्यास प्रतिकारक्षमता कमी असते, हेही नमूद केले होते.
वराह केंद्रे कारणीभूत
“स्वाईन फ्लू’च्या साथीला गेल्या काही वर्षांत बदललेली अमेरिकेतील वराहसंवर्धन केंद्रेही कारणीभूत आहेत. पूर्वापार चाललेले वराहसंवर्धनाचे बंदिस्त; पण मोकळे कोंडवाडे (फार्म्स) जाऊन आता “केफो’ (कन्फाइन्‌ड ऍनिमल फीडिंग ऑपरेशन) या गोंडस नावाखाली टोलेजंग इमारतीतील हजारो वराहांना अपुऱ्या जागेत कोंडून त्यांची संवर्धन केंद्रे सुरू झाली. आर्थिक फायद्यासाठी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले. या “केफो’ जास्त आरोग्यदायक ठेवण्यासाठी गेल्या वर्षी “पिऊ कमिशन’ नेमले गेले होते आणि त्यांनी काही विधायक शिफारशीही केल्या होत्या. त्या मुख्यतः वराहसंवर्धन आणि पक्षिपालन केंद्रे एके ठिकाणी न ठेवण्याबाबत, वराहसंवर्धन केंद्रे पक्ष्यांपासून सुरक्षित ठेवण्याबाबत, वराह खाद्याचा पक्ष्यांशी संपर्क न आणण्याबाबत आणि पक्ष्यांच्या संपर्कात आलेले पाणी न वापरण्याबाबत होत्या. पशुसंवर्धन उद्योगाला त्या शिफारशी न आवडल्याने ते कमिशनच नंतर रद्दबातल झाले!
वराहसंवर्धनातील बेपर्वा वृत्ती “नॅफ्ता’ कराराने अजून वाढली. १९९४ मध्ये व्यापाराच्या संयुक्त वाढीसाठी मेक्‍सिको, अमेरिका आणि कॅनडा या तीन देशांनी हा करार केला. वास्तवात अमेरिकेने बाकीच्या दोन देशांना आपल्या कामी लावून केलेला हा व्यापारी सौदा होता. या कराराने मेक्‍सिकोचे आर्थिक स्वातंत्र्य जाऊन ते देश एक अमेरिकन वसाहत बनला. अमेरिकेत प्रदूषणाच्या कायद्याचे काटेकोर पालन होऊन दोषी कंपन्यांना मोठा दंड होऊ शकतो. मेक्‍सिकोतली सर्वांत मोठी “कॅरोल’ ही वराहसंवर्धन कंपनी अमेरिकेत व्यवसाय करताना प्रदूषणाच्या नियमांचे पालन न केल्याने जबर दंड देऊन बसली. मग तिचा व्यवसाय तसाच मेक्‍सिकोत सुरू झाला; पण आता प्रदूषणाबाबतचा तिच्यावरचा लगाम गेला. मेक्‍सिकोत या कंपनीच्या जवळ असलेल्या ला ग्लोरिया म्युनिसिपालिटीचा प्रदेश दुर्गंधीयुक्त आहे. याच प्रदेशातून स्वाईन फ्लूचा पहिला बालरुग्ण आढळला. नॅफ्ता कराराबद्दल येथील लोकांत नाराजी आहे. ते “स्वाईन फ्लू’ला “नॅफ्ता फ्लू’ म्हणतात, यातच सर्व आले. या केंद्रात ८ ते ९ लाख वराहांचे पोषण एका वेळेस होते आहे. वर्षाला अडीच कोटी वराहांची कत्तल होऊन त्यापासून सहा अब्ज पौंडांचे पॅकबंद खाद्य पदार्थ त्यापासून बनतात! एकूण काय, तर मेक्‍सिको प्रदूषण सोसणार आणि नफ्याचे लोणी अमेरिका खाणार!

“स्वाईन फ्लू’चा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेत देशभर पसरलेल्या आणि मेक्‍सिकोत विस्तार पावलेल्या वराहसंवर्धन केंद्रावर शासनाची करडी नजर हवी. देशाची आर्थिक भरभराट जनतेच्या आरोग्याचा बळी देऊन कधीच होणार नाही. वराहसंवर्धन केंद्रातील पशूंचे बेसुमार प्रजनन, पशूंबरोबर होणारे विषाणू संवर्धन त्यामुळे वाढत्या संसर्गाचा धोका यावर कितीही भाष्ये झाली, तरी ठोस उपाय योजले जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बदलत्या निसर्गक्रमाने “स्वाईन फ्लू’ची साथ आटोक्‍यात येईलही; पण बदललेला विषाणू तसाच दबा धरून राहील आणि पुढील मोक्‍याची वाट पाहील!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: