हेमंत आठल्ये

लोकमान्यांचे पुण्यस्मरण

In सनातन प्रभात on ऑगस्ट 1, 2009 at 12:46 सकाळी

सनातन प्रभात– आपल्या थोर पूर्वजांना विसरून कोणतेही राष्ट्र उदयास येत नाही, असा ऐतिहासिक सिद्धांत आहे. या सिद्धांताचा विसर पडल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जण आपली गौरवशाली परंपरा विसरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर ही आपली गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेतील लोकमान्य टिळकांच्या १ ऑगस्टला असणार्‍या ८८ व्या पुण्यतिथीनिमित्त हे स्मरण…!

देशभक्‍ताला उपयोगी पडणारा पोलीस शिपाई !
१८९८ सालची लोकमान्य टिळक येरवड्याच्या कारागृहात असतांनाची गोष्ट आहे. लो. टिळकांसारख्या देशासाठी लढणार्‍या पुढार्‍याला कारागृहातील भिकार अन्न खावे लागावे, याचे त्यांच्यावर पहारा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या शिपायाला वाईट वाटायचे; म्हणून अधूनमधून तो त्यांना गूळ आणि खोबरे आणून देई. आपल्यामुळे त्याला त्रास होईल, याची कल्पना असल्यामुळे एके दिवशी लो. टिळक त्याला म्हणाले, “माझे तोंड आले आहे. अशा वेळी उष्ण पदार्थ वर्ज्य करायला हवेत.” शिपायाला ते खरेच वाटले. दुसर्‍या दिवसापासून तो गूळ-खोबर्‍याऐवजी बदाम आणि खडीसाखर आणू लागला. लो. टिळकांना त्याचा स्वीकार करणे भाग पडले. पुढे काही दिवसांनी लो. टिळकांची सुटका झाल्यावर हा शिपाई त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटला. टिळकांनी त्याला वीस रुपये आणि रेशीमकाठी धोतर भेट म्हणून दिले. एवढ्या मोठ्या माणसाने आपल्यासारख्या मामुली शिपायाची ओळख ठेवावी, आपला सत्कार करावा, हे पाहून त्याचे डोळे भरून आले. टिळकांच्या चरणांना स्पर्श करीत तो उद्‌गारला, “तुमच्यासारखी देवमाणसे तुरुंगात आलेली पाहिली की, फार वाईट वाटते. म्हणून ती नोकरी सोडावी, असे सारखे मनात येऊ लागले आहे.” लो. टिळक म्हणाले, “आता यापुढे आमच्यासारखी माणसे तेथे पुष्कळ येत रहातील. आम्ही हा पायंडा पाडून ठेवला आहे. अशा माणसांना तुझ्याकडून जो उपयोग होईल, तो दुसर्‍या भलत्या-सलत्याकडून होईल का ? म्हणून, नोकरी सोडण्याची गोष्ट बोलू नकोस. मात्र मला जसा उपयोगी पडलास तसा सर्वांना नेहमी उपयोगी पडत जा, म्हणजे झाले.” आगामी काही वर्षांत येथील काळया इंग्रजांकडून देशभक्‍तांना डांबण्यासाठी कारागृहांची दारे मोठ्या प्रमाणात उघडण्यात येतील. त्या वेळी वरील पोलीस शिपायाच्या गूळ-खोबर्‍याची, तसेच लोकमान्यांच्या विचारांची पोलीसबंधूंनी आठवण ठेवावी !

क्रांतीकारकांना प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि साहाय्य
येरवड्याच्या कारागृहात त्या वेळी फाशीची शिक्षा झालेले दामोदर हरि चापेकर यांनाही ठेवण्यात आले होते. लोकमान्यांनी त्यांना फाशीच्या शिक्षेविरुद्ध अर्ज लिहून दिला. दामोदरपंतांनी `मरतांना जवळ भगवद्‌गीता हवी’, असे म्हटले म्हणून लोकमान्यांनी त्यांना स्वत:जवळची प्रत दिली. एवढेच नव्हे, तर फाशीनंतर दामोदरपंतांचे कलेवरही त्यांनी आपला भाचा धोंडोपंत विद्वांस यांना ताब्यात घ्यायला सांगितले. दामोदरपंतांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य करणे, दामोदरपंतांचा धाकटा भाऊ निजामाच्या राज्यात भूमीगत असतांना त्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था लावणे, हुतात्मा विष्णुपंत पिंगळे यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करणे, ही लोकमान्यांच्या जीवनातील सशस्र क्रांतीकारकांना साहाय्य करण्यासंबंधीची काही ठळक उदाहरणे आहेत.

मृत्यूनंतरच्या मंगळवारीही `केसरी’ टपालात पडला पाहिजे !
१९०२ च्या पावसाळयात पुण्यात पुन्हा प्लेगची साथ सुरू झाली. बरेचसे लोक घाबरून दुसरीकडे रहायला गेले. एके दिवशी `केसरी’ जेथे छापला जायचा, त्या आर्यभूषण मुद्रणालयाच्या धन्याने लो. टिळकांना आपली अडचण सांगितली, “जुळार्‍यांची अनुपस्थिती वाढत चालली आहे; त्यामुळे ही साथ ओसरेपर्यंत `केसरी’चा अंक वेळेवर निघेल कि नाही, याची खात्री देता येत नाही.” लो. टिळक कडाडले, “तुम्ही आर्यभूषणचे धनी (मालक) आणि मी केसरीचा संपादक, आपण दोघेही या साथीत वारलो, तरीही आपल्या पहिल्या तेरा दिवसांतही `केसरी’ मंगळवारी टपालपेटीत पडला पाहिजे.” त्या वेळी टिळकांना गुडघादुखीने ग्रासले होते. चालतांना त्यांना वेदना होत. तरीही ते तसेच चालत गावात गेले व चार-पाच मुद्रणालयांच्या धन्यांना भेटून त्यांच्याकडून त्यांनी जुळारी मिळवले. आर्यभूषणचे धनी व्याधीग्रस्त टिळकांकडे पहातच राहिले !

आदर्श संपादक !
या साथीत लो. टिळकांचे थोरले चिरंजीव विश्‍वनाथपंत यांचे निधन झाले. टिळकांचे जावई श्री. केतकर आपल्या श्‍वशुरांचे सांत्वन करू लागताच टिळक उद्‌गारले, “अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोवर्‍या जाव्या लागतात. त्याप्रमाणेच हे झाले.” विश्‍वनाथपंत वारले रविवारी. दुसरा दिवस सोमवारचा. म्हणजे `केसरी’चा अग्रलेख लिहिण्याचा दिवस. लो. टिळक बहुदा कोणाला तरी त्या दिवशी अग्रलेख लिहायला सांगतील, अशी सगळयांची कल्पना झाली. लेखनिक आला आणि टिळक `श्रीमंत महाराज होळकर यांचा राजीनामा मंजूर झाला’ हा अग्रलेख सांगू लागले. टिळकांचे हे सांगणे पुरे होताच दुसरा मुलगा रामभाऊ तिथे येऊन सांगू लागला, “दादा, बापूला ताप आला आहे.” बापू म्हणजे धाकटे चिरंजीव श्रीधरपंत. लो. टिळकांनी ते ऐकूनही न ऐकल्यासारखे केले. लेखनिकाने उतरवून घेतलेला मजकूर त्यांनी बारकाईने तपासला, त्यात ज्या चुका आढळल्या त्या दुरुस्त करून तो लेख मुद्रणालयाकडे पाठवून दिला आणि मग ते आपल्या मुलाच्या आजाराकडे वळले. लोकमान्य म्हणायचे, “ मी केसरी आठवड्यातून एकदा लिहितो खरा; पण त्या एका दिवशी काय लिहायचे, याचे विचार माझ्या डोक्यात आठवडाभर घोळत असतात.”

सार्वजनिक शिवोत्सवाचे सुपरिणाम !
लोकमान्यांनी १८९५ साली छ. शिवाजी महाराजांचा सार्वजनिक उत्सव चालू केला. हा उत्सव महाराष्ट्रात आणि उर्वरित हिंदुस्थानातच नव्हे, तर अमेरिका व जपान येथेही साजरा होऊ लागला. यातूनच शिवचरित्राचे संशोधन सुरू झाले आणि त्यासंबंधी साहित्य निर्मितीलाही स्फूर्ती मिळाली. हरि नारायण आपटे, द.ब. पारसनीस, वि.का. राजवाडे, वासुदेवशास्त्री खरे, रियासतकार गो.स. सरदेसाई आदी इतिहासकार व साहित्यिक यांनी महाराजांचा पराक्रम गायला. इंग्रजी लेखकांनी महाराजांवर केलेल्या टीकेला अनेक वक्‍ते त्यांच्या भाषणांतून उत्तरे देऊ लागले. एवढेच नव्हे तर इंग्रजी, बंगाली, हिंदी इत्यादी भाषांतून महाराजांवर या काळात पुस्तके प्रकाशित झाली. या उत्सवाचा आणखी एक परिणाम म्हणजे त्या-त्या प्रदेशातल्या वीर पुरुषांचे उत्सवही सुरू झाले. राजस्थानात महाराणा प्रताप, तर बंगालमध्ये प्रतापादित्य यांचा उत्सव सुरू झाला.

धर्मनिष्ठ टिळक !
राजसत्तेची भीती न बाळगता वा लाभाच्या पदावर डोळा न ठेवता लिहिणार्‍या या श्रेष्ठ संपादकाचा आदर्श संधी मिळताच हिंदुत्व, हिंदु धर्म किंवा हिंदूंना जागृत करणार्‍या संघटनांवर दुगाण्या झाडणार्‍या आजच्या संपादकांनी घ्यावा असा आहे. लोकमान्यांच्या मृत्यूपत्रात कोकणाकडची मिळकत त्यांनी कुलदैवत लक्ष्मी-केशव यास अर्पण केली. तत्पूर्वीही कोकणाकडील त्यांच्या मिळकतीतून त्यांनी त्या देवळाच्या जीर्णोद्धाराला साहाय्य केले होते. इंग्रजी शिक्षण आणि ख्रिस्ती मिशनर्‍यांचा आक्रमक प्रचार याला भुलून त्या काळी अनेक जण हिंदु धर्मावर दुगाण्या झाडीत. मात्र लोकमान्य टिळक हिंदु धर्माचे महत्त्व जाणून होते. टिळकांनी धर्मासंबंधी आपली मते अनेकदा व्यक्‍त केली आहेत. स्वामी विवेकानंदांसंबंधीच्या ८ जुलै १९०२ च्या `केसरी’तील मृत्यूलेखात टिळकांनी म्हटले होते, “आमच्याजवळ जर काही महत्त्वाचा ठेवा असेल, तर तो आमचा धर्मच होय. आमचे वैभव, आमचे स्वातंत्र्य, सर्व काही लुप्‍त झाले आहे; परंतु आमचा धर्म अद्याप आमच्यापाशी शिल्लक आहे व तो असा-तसा नव्हे, तर सुधारलेल्या राष्ट्रांत उघड रीतीने कसोटीस लावला असताही त्याचा कस शुद्ध व उत्कृष्ट येतो, हे आता अनुभवास आलेले आहे. अशा स्थितीत जर आम्ही त्यास सोडून देऊ, तर इसापनीतीतील कोंबड्याप्रमाणे आम्ही रत्‍नपारखी आहो, अशी आमची सर्व जगभर नालस्ती होईल !” अशाच तर्‍हेचे विचार त्यांनी वेळोवेळी प्रकट करून आपला धर्माभिमान व्यक्‍त केला आहे. शिक्षणातही त्यांनी धर्मशिक्षणाचा पुरस्कार केलेला आढळतो. ख्रिस्ती मिशनर्‍यांनी चालवलेल्या धर्मांतरानिमित्त हिंदूंना उद्देशून `जागे व्हा किंवा मरा !’ या लेखात (केसरी, २१ मे १९०१) त्यांनी `धर्मस्वातंत्र्य कायम ठेवून आपणाला आता धर्मरक्षणाच्या तजविजी करावयास हव्यात’, असे म्हटले होते. लो. टिळक मंडालेला बंदिवासात असतांना त्यांचे दोघे चिरंजीव मॅट्रीकला होते. अभ्यास कसा करावा, याच्या सूचना पत्रातून देतांना `मनाच्या एकाग्रतेसाठी प्रतिदिन १५ ते २० मिनिटे जप करावा’ अशीही सूचना त्यांनी मुलांना केली आहे. लोकमान्यांच्या चरित्रातून सांगण्यासारखे असे अनेक प्रसंग आहेत. `मी शेंगा खाल्ल्या नाहीत’, या त्यांच्या धारिष्ट्य दाखवणार्‍या गोष्टीसह त्यांच्या चरित्रातील अन्य प्रसंगही भावी पिढीला पुन:पुन्हा सांगायला हवेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: