हेमंत आठल्ये

पुण्यात आढळले स्वाइन फ्लूचे ४६ नवे रुग्ण

In सकाळ, स्वाइन फ्लू on ऑगस्ट 8, 2009 at 10:24 pm

सकाळ– पुण्यातील शाळानंतर आता महाविद्यालयांमध्येही स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स. प. महाविद्यालयातही एका विद्यार्थ्याला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून स. प. महाविद्यालयाने येत्या १६ ऑगस्टपर्यंत सुटी जाहीर केली आहे. आयएलएस विधी महाविद्यालय आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या दोन महाविद्यालयांनी फक्त खबरदारी म्हणून महाविद्यालये तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


शहरात शनिवारी नव्याने ४६ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी २५ रुग्णांवर नायडू रुग्णालयात आणि २१ रुग्णांवर औंधमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णांची संख्या आता २०४ इतकी झाली आहे.
टॅमिफ्लूच्या दोन लाख गोळ्यांचा पुरवठा
पुण्यात स्वाइन फ्लूच्या उद्रेकानंतर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना आखण्यास सुरवात केली आहे. स्वाइन फ्लूवरील उपचारांसाठी रुग्णाला देण्यात येणाऱया टॅमिफ्लूच्या दोन लाख गोळ्या मुंबईत पाठविण्यात आल्या आहेत. यापैकी एक लाख गोळ्या पुण्याला मिळणार असून, अन्य एक लाख मुंबईसाठी देण्यात येणार आहेत.
मुंबईत स्वाइन फ्लूवरील उपचारांसाठी सहा रुग्णालयांमध्ये नव्याने सोय करण्यात आली आहे. यामध्ये भाभा, भगवती, राजावाडी, जेजे, सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयाचा समावेश आहे. यापैकी भाभा, भगवती, राजावाडी आणि जेजे रुग्णालयात प्रत्येकी २० खाटांची सोय करण्यात आली आहे. सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात प्रत्येकी दहा खाटांची सोय करण्यात आली आहे. कस्तुरबा रुग्णालयात आधीपासूनच स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचारासाठी दहा खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यात शुक्रवाऱी आढळले ४० रुग्ण पुण्यात “स्वाइन फ्लू’ची व्याप्ती वाढत असून, शुक्रवारी एकाच दिवसात ४० नवे रुग्ण आढळले. मुंबईतील १६ जणांना लागण झाली आहे. येथील चार नवीन शाळांतील विद्यार्थ्यांना “स्वाइन फ्लू’ झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील ६५ संशयित रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी २४ जणांना “एच१एन१’ विषाणूची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. औंध येथील जिल्हा रुग्णालयातील ४३ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीत पाठविले होते, त्यापैकी १६ जणांचे नमुने “पॉझिटिव्ह’ आले. मुंबईतून पाठविण्यात आलेल्या ३२ जणांच्या नमुन्यांपैकी १६ जणांना लागण झाल्याचे “एनआयव्ही’तर्फे निदान करण्यात आले. राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याने राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुण्यातील विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी सकाळी बैठक घेतली.

राज्यात आढळलेल्या २०४ रुग्णांपैकी १३३ जणांना पाच दिवसांच्या उपचारानंतर घरी पाठविले आहे. ७१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पुण्यात ४० नवीन रुग्ण दाखल झाल्याचे रात्री आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. पुण्याच्या रुग्णांमध्ये मुख्यत्वे शालेय विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व शाळा अजून बंद झालेल्या नाहीत. शाळेच्या व्यवस्थापनाने याबाबत निर्णय घ्यावा, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. विद्यार्थ्याला “स्वाइन फ्लू’ झाल्यानंतर ती शाळा काही दिवस बंद ठेवण्यात येत आहे. सध्या पुण्यातील वीस मोठ्या शाळा “स्वाइन फ्लू’मुळे बंद ठेवल्या आहेत. अनेक पालकांनी मुले शाळेत पाठविणे बंद केल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली आहे. दिल्लीतील “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस’ (एनआयसीडी) या साथीच्या आजाराबाबतच्या संस्थेशी संपर्क साधून येत्या दोन दिवसांत शाळा बंद ठेवायच्या की नाही, याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे डॉ. शिंगणे यांनी सांगितले. दरम्यान, बिशप स्कूल, कोथरूडमधील भारती विद्याभवन, सेंट मेरीज स्कूल या तीन शाळेतील प्रत्येकी एक विद्यार्थी आणि पिंपरीतील शाहूनगरमधील महर्षी डी. वाय. पाटील स्कूलमधील दोन विद्यार्थ्यांना लागण झाली आहे. या शाळांतील विद्यार्थ्यांना “स्वाइन फ्लू’ झाल्याचे आज प्रथमच निष्पन्न झाले. या व्यतिरिक्त पूर्वी सापडलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही लागण झाल्याचे निष्पन्न झाले. औंध येथील रुग्णालयात निष्पन्न झालेल्या सोळा जणांपैकी पाच विद्यार्थी आहेत. पाषाणमधील विद्या व्हॅली शाळेतील तीन विद्यार्थी, लॉयला स्कूल, डीएव्ही स्कूल आणि लष्कर भागातील सेंट ऍन्स स्कूलमधील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

दरम्यान, पावसाळ्यात सर्दी, ताप, अंगदुखी यांचे रुग्ण वाढतात. मात्र, “स्वाइन फ्लू’ झाल्याची भीती वाटत असल्याने अनेक जणांनी त्यांची मुले तपासणीसाठी नायडू रुग्णालयात नेली. त्यामुळे तेथील यंत्रणा गुरुवारी कोलमडली होती. पुणे महापालिकेने १५ ठिकाणी तपासणीची सोय केली. त्या ठिकाणी आज दिवसभरात तीन हजार ५७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १३४ रुग्ण संशयित आढळले असून, त्यांना नायडू रुग्णालयात अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही आजपासून आठ ठिकाणी प्राथमिक तपासणीची सोय केली आहे.
शुक्रवारी काय झाले
आरोग्य मंत्री – शाळा बंद करण्याबाबत दोन दिवसांत निर्णय
शाळा – पुण्यातील चार नव्या शाळांमधील विद्यार्थ्यांना संसर्ग
कॅंटोन्मेंट – दहा शाळा बंद, इतर दहा खासगी शाळा बंद
महापालिका – पंधरा तपासणी केंद्र कार्यान्वित
डॉ. नायडू रुग्णालय – रुग्णालयावरील ताण कमी
औंध रुग्णालय – सोळा नवीन रुग्ण
“एनआयव्ही’ – नमुने तपासण्याची क्षमता वाढविली
पिंपरी – आठ तपासणी केंद्रे सुरू
२० शाळा बंद
सेंट ऍन्स, बिशप (कॅम्प, उंड्री व कल्याणीनगर), सिंधू विद्या भवन (सिंध सोसायटी), विद्या व्हॅली (सूस रस्ता), सेंट हेलेना, इंदिरा नॅशनल स्कूल (बाणेर), दिल्ली पब्लिक स्कूल, लॉयला हायस्कूल, पुणे कॅंटोन्मेंटच्या सर्व दहा शाळा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: