हेमंत आठल्ये

‘ठणठणीत’ ठाकरेंची ‘खणखणीत’ मुलाखत

In बातमी, म. टा. खास on ऑगस्ट 28, 2009 at 12:35 pm

म. टा. खास– एक जमाना होता… माझ्या या हाताने मोठमोठ्या राजकारण्यांना थरथर कापायला लावलं… आता मात्र तो हातच थरथर कापतोय… व्यंगचित्रकलेचा हात गेला माझा… आता मूडच लागत नाही… अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मनातील वेदना आज बोलून दाखवली. पण जर माझा हात स्थिरावला तर पहिला फटका तुम्हालाच मारेन… अशी खास ठाकरे स्टाईल चपराकही त्यांनी यावेळी लगावली.

मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त ख्यातनाम मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतीच्या सीडीज आज शिवसेनेच्या वतीने प्रसिद्धीमाध्यमांना देण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनाप्रमुखांची प्रकृती ठीक नाही. परंतु ही मुलाखत पाहताना बाळासाहेब ठाकरे एकदम तंदुरूस्त असल्याचे प्रकर्षाने जाणवले. भगवी कफनी आणि लुंगी अशा वेषात दाढीवाल्या बाळासाहेबांनी गाडगीळांच्या सगळ्या प्रश्नांना अगदी खणखणीत आवाजात उत्तरे दिली. महत्त्वाचे म्हणजे १९४७ सालापासूनचे सगळे संदर्भ त्यांना बिनचूक लक्षात आहेत. एवढेच नव्हे तर पाच-सहा वेळा त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलने कोपरखळ्याही मारल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बाळासाहेब ठाकरेंची मुलुखमैदान तोफ पुन्हा धडाडू शकते, याची प्रचिती ही मुलाखत पाहताना आली.

बाळासाहेबांचा हजरजबाबीपणा
या दुखण्यामुळे मी साफ झालो. साफ उतरलो. पूर्वीची ताकद राहिली नाही आता… असे बाळासाहेबांनी मुलाखतीत सांगितले. परंतु त्यांचा जोश, मिश्किलपणा, समोरच्याची फिरकी ताणण्याची सवय अजूनही कायम असल्याचे यानिमित्ताने जाणवले. आजवरचे तुमचे सर्वात आवडते भाषण कोणते, या प्रश्नावर ठाकरे हसत हसत म्हणाले की, असं नाही सांगता येणार. हे म्हणजे आपण पाच-सहा पोरं काढायची आणि त्यातलं लाडकं पोर कुठलं, असं बापालाच विचारण्यासारखं झालं ?बापाला सगळी पोरं सारखीच…

बाळासाहेबांचा मिश्किलपणा
पूर्वी बाळासाहेब लेंगा-सदरा घालायचे, मग गळाबंद जोधपुरी कोट आला. आता भगवी कफनी व लुंगी घालतात. त्यांच्या या कपड्यांमधील बदलाबाबत गाडगीळांनी छेडले तेव्हा बाळासाहेबांनी मिश्किल टोला हाणला. मी तसा कपड्यांचा शौकिन नाही. फक्त ते स्वच्छ आणि कडक इस्त्रीचे असावेत. येरागबाळ्यासारखे राहायला आवडत नाही मला. पण एक आहे. मी अजूनही कपडे घालूनच फिरतो हं… असा ठाकरी टोला त्यांनी लगावला.

उद्धवच्या कामावर बाळासाहेब समाधानी
मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाबद्दलच्या चिडीतून शिवसेनेची स्थापना झाली. वाचा आणि थंड बसा… अशा सदराखाली मार्मिकमधून व्यंगचित्रे काढायचो. खूप प्रतिसाद मिळायचा, पण मराठी माणसं खरोखरच थंड बसलेली. मग मी मथळा बदलला. वाचा आणि उठा… मग एकदम रान उसळलं.. अशी आठवण त्यांनी सांगितली. वसंतसेना, सदाशिवसेना अशी अनेकांनी शिवसेनेची टिंगल केली. परंतु वसंतराव नाईक किंवा स. का. पाटील यांनी सांगितले आणि मी केले, असे अजिबात झालेले नाही. मी माझ्या पद्धतीनेच गेलो… असे सांगतानाच आता उद्धवनेही शिवसेना मजबुतीने सांभाळलीय. त्याबाबत मी समाधानी आहे… अशी कौतुकाची थाप ठाकरेंनी उद्धवच्या पाठीवर ठोकली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: