हेमंत आठल्ये

सांगली-मिरजेत ‘शांत’ अशांतता

In बातमी, म. टा. खास on सप्टेंबर 5, 2009 at 10:33 pm

म. टा. खास– गणेशोत्सवातील ‘अफझलखानाचा वधा’चा देखावा असलेल्या कमानीच्या उभारणीवरून उद्भवलेल्या मिरजेतील हिंदू-मुस्लिम जातीय दंगलीचे लोण आता सांगली जिल्हा व आजूबाजूच्या जिल्ह्यांतही पसरत आहे. बंद, दहशत, भीती व दंगलग्रस्त अशांत परिस्थितीमुळे सांगली-मिरजेतील सामान्य जनता तीन-चार दिवस जीव मुठीत घेऊन जगताना दिसत असून, सर्वत्र अघोषित संचारबंदी सुरू असल्याप्रमाणे कडकडीत ‘बंद’चे येथे वातावरण आहे.

दगडफेक, जाळपोळ, वाहनांच्या काचा फोडणे, हल्ले चढवणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. क्रियाशून्य जिल्हा प्रशासन, पक्षपाती पोलिस यंत्रणा, मतांच्या राजकारणासाठी नेत्यांचे याप्रकरणाकडे दुर्लक्ष यांमुळे सामान्य लोकांना वेठीस धरले जात आहे. सांगली-मिरजेतील ठिकठिकाणच्या मशिदींसमोर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. तरुणांचे घोळके ‘जय शिवाजी, जय भवानी’ चे नारे देत फिरत आहेत. जाळपोळ झाल्याचे कळताच अगिन्शामक दलाचे बंब येऊन आग विझवतात, पोलिस येऊन हिंसक जमावाला पांगवतात असा खेळ सांगली-मिरजेच्या विविध भागांत तीन दिवस सुरू आहे. विशिष्ट समाजाची दुकाने, दवाखाने फोडणे, वाहनांची मोडतोड करणे हे प्रकारही सुरू आहेत. या प्रकारांमुळे सांगली-मिरजेत सरकारचे अस्तित्व आहे का असा प्रश्न पडतो आहे.

शिवसेना-हिंंदू एकताची मिरजेतील ‘अफझलखानाचा वध’ देखावा असलेली कमान ही या दंगल सुरू होण्याचे निमित्त ठरली. सरकारने या कमानीला आधी परवानगी दिली मात्र, नंतर ती नाकारली. त्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजल्यापासून हिंदू-मुस्लिम दंगलीला सुरुवात झाली. दगडफेक, मोडतोड, लाठीमार असे प्रकार उसळल्यावर रात्री शहरात दंगलग्रस्तांची धरपकड झाली. तर, गुरुवारी प्रचंड पोलिस कुमक येथे पोहोचली. मिरजेच्या दंगलीचे लोण हळूहळू सांगली व आजूबाजूच्या गावातून पसरले. मिरजेत गणपतीच्या मूतीर्ंची विटंबना करणाऱ्या, कमानींची नासधूस करणाऱ्या व नाहक दंगल माजवणाऱ्या मुस्लिम समाजकंटकावर कडक कारवाई केल्याशिवाय मिरजेत गणपतींचे विसर्जन केले जाणार नाही, अशी ठाम भूमिका मिरजेतील सार्वजनिक गणपती मंडळानी घेतली. ‘प्रथम कमान उभी करा, मग विसर्जन मिरवणूक’ हा हट्टही त्यांनी धरला आहे. प्रशासनाचा यालाही विरोध आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अशांतता, अस्वस्थता आणखी किती काळ राहणार असा प्रश्न चिंताग्रस्त नागरिक विचारत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: